Saturday, 19 October 2013

धुंद स्वच्छंद...


Dhunda


फिरायला जायचं असेल तर ट्रॅव्हल कंपन्या त्यांच्या पॅकेज टूर्स ऑफर करतात. पण, सकाळी ६ वाजता उठायचं म्हणजे उठायचं...७ ला हॉटेल सोडायचंच...एखाद्या ठराविक हॉटेलमध्ये जेवायचं...सो बोअरिंग यार. ही सगळी बंधनं हवीच कशाला? त्यापेक्षा आपल्या मनाचे आपणच राजे. हवं तिथे जायचं...हवा तेवढा वेळ थांबायचं...मनसोक्त फोटो काढायचे... अशी भटकंती मस्त ना? अशाच प्रकारे आपली टूर स्वतःच प्लॅन करून ती एन्जॉय करणाऱ्या काही कुटुंबांनी, त्यांचे अनुभव आजच्या 'वर्ल्ड टुरिझम डे'च्या निमित्ताने खास 'मुंटा'शी शेअर केले.


हवं तिथे...हवं तेव्हा

आमच्या कुटुंबात आम्ही चौघेजण. कधी एखादी फॅमिली आली तर तीही, असे आम्ही टूरवर जातो. आतापर्यंत आम्ही भारतात तसंच परदेशातही पुष्कळ फिरलोय. भारतात मध्यप्रदेश, गुजरात ही राज्यं सोडली इतरत्र फिरणं झालंय. तर इजिप्त, हाँगकाँग, सिंगापूर, लंडन, नेपाळ असं परदेशातही भटकंती झाली आहे. स्वतंत्रपणे फिरण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला हवं तिथे जाता येतं, हवं तेवढा वेळ थांबता येतं. परदेशात तर ट्रॅव्हलिंग खूप सोपं असतं. तिथे जागोजागी नकाशे, माहिती देणारे फलक लावलेले असतात. त्यामुळे कुठेही गोंधळायला होत नाही. आमची परदेश प्रवासाची सुरूवात झाली ती सिंगापूरने. त्या ट्रिपने आम्हाला आत्मविश्वास दिला. त्यानंतर परदेशातल्या अनेक टूर्स आम्ही केल्या. विमानांचे रुटस, लो एअरफेअर्सची माहिती या सगळ्या गोष्टी इंटरनेटवर कळतात. त्यामुळे कमी खर्चात आपली टूर होऊ शकते. त्याचा उपयोग करून घ्यायला हवा.

- वृषाली- किशोर देशमुख

मनसोक्त फोटोग्राफी

मला स्वतःला फोटोग्राफीची खूप आवड आहे. या आवडीतून माझं टुरिझम सुरू झालं. लग्न होण्यापूर्वी लडाख, काश्मीर, वैष्णवदेवी, अमरनाथ, हिमाचल प्रदेश अशा टूर्स मी आणि माझा मित्र आम्ही मिळून केल्या होत्या. तेव्हा तर इंटरनेटची सुविधा नव्हती. त्यामुळे रेल्वेचं भलंमोठं टाइमटेबल घ्यायचं, त्यातनं आपल्याला हवी ती ट्रेन शोधून काढायची, रांगेत उभं राहून रिझर्व्हेशन करायचं हे सर्व आम्ही केलं आहे. आता गेल्या वर्षी सहकुटुंब मी माऊंट अबूला जाऊन आलो. तेव्हा आम्ही इंटरनेटवरुन सर्व बुकिंग केलं. पण तिथे फिरताना आम्ही शक्यतो स्थानिक बससेवेने फिरतो. त्यामुळे तिथलं लोकजीवन जवळून बघता येतं. काही लोक भेटतात जे खूप चांगली माहिती देऊन जातात. शिवाय मला फोटोग्राफी करण्यासाठीही पुष्कळ वाव मिळतो. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आम्ही राजस्थानला जायचं ठरवलंय. तिथल्या ‌हवेल्या-किल्ले यांची माहिती घेतली आहे. हॉटेल्स मात्र तिथे जाऊन आम्ही बुक करणार. कारण प्रत्यक्ष तिथे गेल्यावर हॉटेलवाल्यांशी खूप घासाघीस करता येते. त्यामुळे खर्चात खूप फरक पडतो.

- निशिकांत म्हात्रे

सर्च आणि टूर

आमचा हनीमूनच आम्ही स्वतः प्लॅन केला होता. कर्नाटकमधलं कूर्ग, कबिनी अशी आमची मस्त टूर झाली. हे डेस्टिनेशनसुद्धा आम्हाला आमच्या फ्रेंड्सकडून कळलं. ठिकाण कळल्यावर आम्ही नेटवर जाऊन सर्च केलं. ती माहिती, फोटोज पाहून इथेच जायचं आम्ही नक्की केलं. एकदा हे ठरल्यावर तिथली हॉटेल्स, रिसॉर्टसच्या वेबसाइट्स पाहायला सुरूवात केली. आवडलेलं फाइव्हस्टार रिसॉर्ट बुक केलं. त्यानंतर विमानाची तिकिटं काढली. तिथे फिरण्यासाठी कार-टॅक्सीही हवी होती. एका कंपनीकडून आम्ही आठ दिवसांचं पूर्ण पॅकेजच घेतलं. आमची ही हनीमून टूर खूप मस्त झाली. रिसॉर्टस छान होती, त्यांची सर्व्हिसही चांगली मिळाली. वी आर हॅप्पी. एखाद्या ट्रॅव्हल कंपनीत जाऊन पॅकेज घ्यायचं किंवा ट्रॅव्हल एजंटकडे बुकिंग करण्यापेक्षाही आम्हाला हे जास्त सोयिस्कर वाटलं. हनीमूनच्या निमित्ताने हा पहिला अनुभव मिळालाय. आता यापुढेही आम्ही अशाच प्रकारे पुढच्या टूर्स करणार हे नक्की.

- ऋतुजा-अभिषेक पटवर्धन

हम साथ-साथ

आम्ही जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा आमची पूर्ण फॅमिली पिकनिकच जाते. त्या निमित्ताने कुटुंबाचं गेट टुगेदरही होतं. सुरूवातीला आम्ही महाराष्ट्रात माथेरान, भीमाशंकर अशी ठिकाणं केली. त्यानंतर परदेशात जायचं म्हणून २००३ मध्ये आम्ही नेपाळची एक टूर केली. तिथली सगळी माहिती आम्ही टुरिझम ऑफिसमधून मिळवली. यापूर्वी तिथे गेलेल्यांचे अनुभव जाणून घेतले. अगदी ८ महिन्यांच्या मुलीपासून ७० वर्षांच्या माझ्या आईपर्यंत सगळेजण या टूरमध्ये होते. काठमांडूहून एव्हरेस्ट पाहून येण्यासाठी तर आम्ही पूर्ण चार्टरच बुक केलं होतं. टूरवर कुटुंबातली मंडळीच असल्याने आपण रिलॅक्स्ड असतो. एखाद्या ठिकाणी पोहोचलो की आम्हाला हॉटेल्सची चौकशी करून यायला वेळ मिळायचा. त्यामुळे खूप चांगली हॉटेल्स, कमी किंमतीत मिळतात. कर्नाटकची टूर जेव्हा गेली तेव्हा मुंबईहूनच आम्ही बस केली होती. कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र बसने प्रवास करण्यातली मजा काही औरच. २०११ मध्ये आम्ही काश्मीर टूर केली. हा एक छान अनुभव होता. कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र जाण्यातली मजा कुठल्याही हायफाय पॅकेज टूरमध्येही मिळणार नाही.

- राजन फाटक

... आणि कॅमेरा सरसावला

camera

निसर्गाला अजिबात त्रास न देता केलेली फोटोग्राफीही बरेचदा भन्नाट अनुभव देते. अशाच काही नेमानं पण हौस म्हणून निसर्गभ्रमंती करणाऱ्या पुणेकर तरुणांनी फोटोग्राफीच्या दरम्यान त्यांना आलेले अविस्मरणीय ,आश्चर्यकारक आणि बेमिसाल अनुभव पुणे टाइम्स ला सांगितले. वन्यजीव सप्ताहानिमित्त ही खास स्टोरी... 

सुवर्ण गरुड आणि शिकार 

लेह-लडाखच्या टूरवर असताना जंगलभ्रमंती करायची किंवा विशिष्ट प्राणी पाहायचा असं काही ठरवून गेलो नव्हतो. निसर्ग पाहायचा इतकंच डोक्यात होतं. जे दिसेलते अनुभवायचं असा विचार होता. 

एकदा पॅनगॉग लेकच्या वाटेवर असताना मला अचानक १० ते १५ फुटांवर सुवर्ण गरुड दिसला. मुळात हा फार सहजासहजी दिसणारा पक्षी नाही. त्यामुळे मी जाम खूष झालो. शक्य त्या पद्धतीनं त्याचे फोटोही काढले आणि परतीच्या वाटेवर निघालो. केवळ सुवर्ण गरुड दिसला याच आनंदात असल्यामुळे असेल कदाचित पण नीट फोटो पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्या गरुडानं हिमालयीन बकरीची शिकार पायात घट्ट धरली होती. त्या क्षणी नकळत का असेना पण अचानक असा भन्नाट फोटो मिळाल्याचा जबरदस्त आनंद झाला. 

अमित जायदे 

... अखेर किंगफिशर टिपला 

ताम्हिणी घाटात किंगफिशरचे फोटो काढायला मित्रांसहित मी गेलो होतो. आम्हाला ओरिएंटेल डॉर्फ किंगफिशरचे (किंगफिशरची एक जात) फोटो हवे होते. हा पक्षी दुर्मीळ होत चाललाय. मान्सूनमध्येच तो दिसतो. त्याची एक छबी टिपण्यासाठी सलग दोन महिने ताम्हिणीमध्ये चकरा मारता होतो. अखेर तो दिवस आला! किंगफिशरला कॅमेऱ्यात टिपण्यात मी यशस्वी झालो होतो. पाच-सहा तास एका ठिकाणी थांबून मला तो फोटो मिळाला. या किंगफिशरचं वैशिष्ट्य म्हणजे जगातील सगळ्यांत लहान आकाराचा आणि वजनाचा तो आहे. त्याचं वजन केवळ १२ ग्रॅम असतं. तो रंगिबेरंगीही असतो. पक्षी प्रचंड चंचल असल्यानं त्यांना कॅमेराबद्ध करणं खूप अवघड असतं. त्यात किंगफिशरची दुर्मीळ जात म्हणजे काही विचारायला नको. त्याचा एक फोटो माझ्या संग्रहात आहे याचा आनंद वाटतोय. 

आणखी एक म्हणजे यावर्षी मार्चमध्ये मी ताडोबाला गेलो होतो. तिथं वाघाचे पोट्रेट फोटो मिळून जातात पण खेळणाऱ्या किंवा भांडणाऱ्या जोडीचे फोटो मिळणं तसं मुश्कील आहे. मी यात नशीबवान ठरलो! सकाळी तीन तास थांबल्यानंतर मला हट के फोटो मिळून गेला. त्यांची खेळकर छबी टिपण्यातही मी यशस्वी झालोय. 

आदित्य पाध्ये 

वेगळ्या पोझच्या शोधात... 

मागच्या वर्षी डिसेंबरच्या सुमारास सिंहगड व्हॅलीमध्ये फोटोग्राफीसाठी गेले होतो. एशियन पॅरेडाइज आयकॅचर या पक्षाचे फोटो मला काढायचे होते. खरं तर याचे फोटो काढणं अवघड काम नाही कारण नर आणि मादी एकत्र बसलेल्या पोझ कितीतरी जणांना मिळाल्या आहेत. मला मात्र उडताना किंवा उडण्यासाठी झेप घेतानाचे फोटो हवे होते. त्यातल्या त्यात नराचे. तो दिसायला खूपच देखणा आणि रुबाबदार असतो. मला त्याचे नाही ,तर मादीचे उडतानाचे आणि टेक ऑफ करतानाचे दोन फोटो त्यादिवशी मिळाले. तीन तास लागले हे फोटो मिळायला! त्यातला एक फोटो तर मादीनं तोंड उघडल्याचा आहे. त्यामुळे तिच्या तोंडातले रंगही मला टिपता आले! 

स्वाती गावडे 

कचऱ्यातलं सोनं! 

वाईच्या पुढे गावातला एक कचरा डेपो आहे. तिथं स्टेपी इगल्स दरवर्षी येतात. हा स्थलांतरित होणारा पक्षी असून डिसेंबर-फेब्रुवारीदरम्यान रशियामधून भारतात येतो. हा गरुड उंचीला अडीच फुटांचा असतो. साधारण जिथं घाणीचं साम्राज्य असतं तिथं त्यांचं वास्तव्य जास्त असतं. मला त्याचा फोटो हवाच होता. कचरा डेपो गाठला. सकाळी ६ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत थांबून हव्या तेवढ्या त्याच्या पोझ मिळवल्या तेही कचरा डेपोच्या आसपास थांबून. डास घाणीचा वास धूळ आणि मुख्य म्हणजे कचरा... असा तो परिसर. त्या सगळ्याचा अजिबात विचार न करता कचऱ्यातून सोनं मिळाल्याचा आनंद आज होतोय. 

रितेश नांगरे 

बेस्ट क्लिक 

लडाखच्या डोंगराळ भागात समुद्रसपाटीपासून तब्बल १४ हजार फूट उंचीवर आम्ही होतो. दूर डोंगराच्या कपारीत उभी असलेली तिबेटन अर्गली ' ( शेळीची स्थानिक जात) मला खुणावत होती. एरवी दुर्मीळ असलेला हा प्राणी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मी खूप उत्सुक होतो पण तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्यानं बरंच अंतर पायी कापावं लागणार होतं. एवढ्या उंचीवर असल्यानं ऑक्सिजनची कमतरता त्यात कॅमेरा आणि इतर साहित्याचं ओझं घेऊन चालणं खरंच खूप अवघड होतं. शिवाय या ठिकाणी फक्त लहान-सहान खुरटी झुडपंच आढळतात. त्यामुळे लपत-छपत जाण्यासाठी मध्ये कोणतेच अडथळे नव्हते. त्या प्राण्याला चाहूल लागू न देण्यासाठी बऱ्याचदा गुडघ्यावर तर अधून-मधून रांगत पुढे जावं लागलं कारण उभी मनुष्याकृती प्राण्यांच्या चटकन लक्षात येते. त्याचबरोबर श्वासावरही नियंत्रण ठेवावं लागत होतं. कारण दम लागलेला असताना हात 'शेक होतात. त्यामुळे फोटो काढता येत नाही. तिथं पोहोचल्यानंतर मिळालेला क्लिक अपूर्व समाधान देऊन गेला. माझ्या वाइल्ड फोटोग्राफीच्या बारा वर्षांच्या अनुभवात अविस्मरणीय असा हा प्रसंग होता. 

देवेंद्र गोगटे 

श्रीलंकन फ्रॉग माउथ आणि उधळेलेले गवे 

भीतीदायक आवाजाचा श्रीलंकन फ्रॉग माउथ हा पक्षी आम्हाला आंबोलीच्या जंगलात अचानक दिसला होता. खरं तर तेव्हा त्याला शोधण्याचा आमचा विचार नव्हता कारण तो आपल्याकडे दुर्मिळ म्हणून गणला जायचा. झाडाच्या फांदीसारखाच त्याचा रंग असतो त्यामुळे त्याच्या जवळ गेलं तरी ओळखू येत नाही. त्याचं दिसणंही जरासं भयानकच आहे. त्यात हा फक्त रात्री आढळणारा पक्षी असल्यानं अनेकांना माहीत नाही. आम्ही आंबोली परिसरात फिरत होतो. 
आंबोलीत रस्त्याला लागूनच दाट जंगल आहे. स्थानिक वाटाडे सोबत होते. ते आम्हाला सांगत होते की या वाटेवरून बिबट्या फिरत असतो. माझ्या हातात कॅमेरा ट्रायपॉड टॉर्च वगैरे होतं. भयकारी आवाज आला आणि वाटाड्यांनी हा पक्षी दाखवला. जवळ जाऊनही तो दिसत नव्हता. पाहिला तेव्हा खूप आनंद झाला. पक्षांचे फोटो काढताना फ्लॅश न वापरण्याची प्रथा आहे. कमी उजेडात त्याचे फोटो घेतले. पुढं आम्ही चालत असताना अचानक गवे समोर आले. नर मादी आणि पिल्लू. पिल्लं होण्याच्या काळात गवे आक्रमक असता. ज्याची भीती होती तेच झालं. समोरून गवे उधळले आणि जणू काही धरणीकंप होतोय असा आवाज येऊ लागला. वाटलं गवे आमच्यावरच उधळले. तेव्ही जी धूम ठोकली ती आजही लक्षात आहे. पुन्हा जंगलातून बाहेर आलो. त्यानंतर उजवीकडे पाहात दुसरी वाट पकडली तर डावीकडूनही गवे आलेले दिसले. भीतीनं गाळणं उडाली. सुदैव असं ,की त्यांनी काही केलं नाही. मात्र अशा धामधुमीत दिसलेला श्रीलंकन फ्रॉग माउथ हा पक्षी आणि गव्यांचं उधळणं आजही लक्षात आहे. 

विश्वतेज पवार

from - http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/recharge/---/articleshow/23612047.cms

भटक्यांची ‘दिवाळी’

bhate.jpg

यंदाची दिवाळी कशी साजरी करायची, काय-काय खरेदी करायची, किती फटाके फोडायचे, त्याचं नियोजन करायला कित्येकांनी सुरुवात केली असेल. भटक्यांच्या मनात मात्र जोडून आलेल्या सुटीत कुठं-कुठं फिरायला जायचं याचे बेत शिजायला नक्कीच सुरुवात झाली असेल. एक-दोन दिवसांचे ट्रेक कधीही होतात; पण या सुटीचा खऱ्या अर्थानं उपभोग घ्यायचा असेल, तर एक जंबो ट्रेक तो बनता है... 


महाबळेश्वर आणि त्याच्या आसपासच्या दऱ्याखोऱ्या हे ट्रेकर्सचं हॉट फेव्हरिट ठिकाण झालं आहे. वेगवेगळ्या मार्गांतून हे स्थळ गाठणं ट्रेकर्स जमातीचा जणू काही छंदच झाला आहे. त्याचप्रमाणं हरिश्चंद्रगडाची रुळलेली वाट सोडून नवे मार्ग जोखण्यासाठी, भीमाशंकरच्या वनराईचा आस्वाद घेण्यासाठी या नव्या वाटा दऱ्याखोऱ्यांत रमणाऱ्यांना साद घालत आहेत. तिथून पुण्याचं रिटर्न तिकीट काढताना एक आग‍ळा अनुभव आणि अनुपम निसर्गसौंदर्य आपल्या गाठीशी असतं. 

प्रतापगडमार्गे आर्थरसीट 

महाबळेश्वरच्या पोलो ग्राउंडपासून ऐतिहासिक वाटेनं प्रतापगड मार्गे महाबळेश्वरच्या आर्थरसीटपर्यंतचा सुटीतील तीन दिवसांचा खास ट्रेक इथं करता येईल, अशी माहिती युवाशक्ती चे अनिल मते यांनी दिली. ही जंगलातील वाट अनुभवावी अशीच आहे. ३५० वर्षांपूर्वींचा शिवकालीन पूलही इथल्या वाटेत लागतो. पहिल्या दिवशी गडावर पोहोचल्यानंतर गडदर्शन आणि मुक्काम होतो. दाभिळ गावातून जाऊन करंजखिंडींमार्गे तानाजी मालुसरेंचे उंब्रज गाव, त्यानंतर त्या पट्ट्यातील सर्वांत आतमधील आणि शेवटच्या अशा ढवळे गावात मुक्काम होतो. या गावातून चंद्रगडाला वळसा घालून आर्थरसीटकडे यावं लागतं. हा मार्ग घनदाट जंगलाचा असल्यानं दुपारी तिथं जमिनीपर्यंत सूर्यकिरणं पोहोचत नाहीत. ही वाट ऐतिहासिक असल्यानं जुन्या खुणा, वाटसरूंसाठी पाण्याची टाकी, पायऱ्या असा घाटरस्ता आहे. सगळीकडे नैसर्गिकपणे चढता येतं, कुठंही रोप क्लाइंम्बिंग करण्याची गरज नाही, असंही मते यांनी सांगितलं. 


भोर ते आर्थरसीट 

भाटघर धरणाच्या डाव्या काठावर वसलेल्या सांगवी गावापासून महाबळेश्वरच्या आर्थरसीटपर्यंतच्या भन्नाट ट्रेकची माहिती सह्याद्री ट्रेकर्स च्या सुरेंद्र दुगड यांनी दिली. पुण्यापासून भोरपर्यंत अर्थातच एसटीनं यावं लागतं. सांगवीवरून निघाल्यानंतर गोप्या घाटमार्गे शिवथर गावात उतरायचं. माजिरे गावात शाळा, छोटी हॉटेल तसंच घरगुती मुक्कामाची सोय आहे. तळे-किये-पिंपळवाडीपर्यंतचा रस्ता म्हणजे निसर्गसौंदर्याची मेजवानीच. दोन नद्या आणि अतिशय सुंदर धबधबा इथं पाहायला मिळतो. त्याखाली पाण्याचं कुंडही आहे. पुढे मंगळगडाकडे कूच करून कामठेखिंडीतून पुढे महादेवाचा मुढा नावाचं आदिवासी गाव लागतं. पुढे ढवळ्यापर्यंत जाऊन तिथं तिसरा मुक्काम होतो. तिथून पुढे आर्थरसीटची १००० मीटरची चढण चढून आपण वर येतो. 

भोर ते महाबळेश्वर 

भोर-रोहिडा- रायरेश्वर- केंजळगड- कमळगड- महाबळेश्वर असा हटके; पण स्टॅमिना जोखणारा ट्रेक ट्रेकरूट 'च्या निरंत सरदार यानं सांगितला. भोरला एसटीनं गेल्यावर रोहिड्याच्या पायथ्यापर्यंत जीपनं जाता येतं. हे अंतर पायीही जाणारे आहेत; पण डांबरी रस्ता झाल्यानं पदभ्रमणाची काही विशेष मजा येत नाही. त्यामुळेच वाहनानं हे अंतर कापून वेळ वाचवणं योग्य ठरतं. रोहिडा चढून गेल्यावर आंबवडे गावात उतरावं. त्यानंतर रायरेश्वर पायथ्यापर्यंतचं सुमारे १५ किमी अंतर पुन्हा एसटीनं कापणं योग्य ठरतं. पायथ्याशी कोर्ले गावातून रायरेश्वरला पोहोचल्यानंतर तेथील छोट्या वस्तीत असून मुक्कामाची चांगली सोय आहे. त्यानंतर केंजळगडपाहून खावली गावात उतरून कमळगडाकडे कूच करावं. त्याच्या अलीकडे असलेल्या वाडीत मुक्कामानंतर दोन तासांची कमळगडाची चढणं चढावी. खाली उतरून जोर धरण ओलांडून वयगावात आल्यानंतर महाबळेश्वरचा केट्स पॉइंट दिसतो. तिथून एसटीनं पुण्याला येता येतं. 


रतनगड- हरिश्चंद्रगड 

नेहमीच्या मार्गानं हरिश्चंद्रगडला जाणं झालं असेल, तर हा दुसऱ्या दिशेनं येणारा मार्ग नक्कीच वेगळा अनुभव देऊन जातो. पुण्याहून संगमनेर-अकोलामार्गे भंडारदरा आणि तिथून पुढं सामरद गावापर्यंत एसटी येते. इथल्या रतनवाडीत पहिला मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लवकर निघून रतनगड पाहाता येतो. त्यानंतर घनचक्कर रांगेतील कात्राबाई खिंड ओलांडावी लागते. ही खिंड सुमारे १४०० मीटर उंचीवर आहे. ती ओलांडून कुमशेतला दुसरा मुक्काम करावा. ही जंगलवाट अतिशय निसर्गसुंदर आहे. कुमशेत इथल्या मुळा नदीत यथेच्छ डुबक्या मारून अंघोळ करण्याचा आनंद मिळतो. या मार्गात २-३ वेळा ही नदी आपाल्याला ओलांडावी लागते. पाचनईत गावातून हरिश्चंद्रगडाच्या उत्तेरकडून गडावर चढणं तुलनेनं सोपं आहे. गडावर फिरून टोलार खिंडीमार्गे खिरेश्वर आणि तिथून एसटीनं पुण्याला परतावं. हा ट्रेक अतिशय नयनरम्य असून, गावांच्या ठिकाणी जेवणाची सोय होऊ शकते. त्यामुळे विशेष साहित्य सोबत घेण्याची गरज नाही. अगदी तांदळाच्या भाकरी, पिठलं यासारखं तोंडाला पाणी सुटणारं जेवण गावकरी मनापासून करून देतात, अशी माहिती सह्याद्री ट्रेकर्स च्या सुरेंद्र दुगड यांनी दिली. 

भोरगिरी ते भीमाशंकर 

पुणे- राजगुरूनगर मार्गे भोरगिरी किल्ल्यापर्यंत एसटीनं जाता येतं. हा छोटासा किल्ला पाहून भीमाशंकरकडे जाणारी जंगलवाट एक अपूर्व अनुभव देऊन जाते. भीमाशंकर मंदिर परिसरात मुक्काम, जेवणाची चांगली सोय आहे. दुसऱ्या दिवशी भीमाशंकर ते आहुपे हे ९-१० किमीचे अंतर कापावं लागतं. सह्याद्रीच्या वरच्या बाजूनं असल्यानं हा चढ-उतार फारसा नसून, सरळ चालणं बरंच आहे. आहुप्यातून कोकणात साधारण निम्म्यापर्यंत खाली उतरून सिद्धगडवाडीत मुक्काम होऊ शकतो. तिसऱ्या दिवशी वर चढून सिद्धगड आणि त्यानंतर गोरखगडकडे प्रयाण करावं. सिद्धगडावरील पाण्याची टाकी तर गोरखगडावरील गुहा, कोरीव लेणी आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहाण्यासारख्या आहेत. या लेण्यांमध्ये मुक्काम तसेच आपापली जेवणाची सोय होऊ शकते. गड उतरून खालील छोट्या गावातून एसटी मिळते. मुरबाडमार्गे कल्याण आणि तिथून पुणं गाठता येतं, असं ट्रेकरूट च्या निरंत सरदार सांगतो. 

काय काळजी घ्यावी? 

मोठे ट्रेक करण्याआधी एक-दोन दिवसांच्या ट्रेकचा अनुभव असावा. 
मोठ्या कालावधीचे ट्रेक करण्याआधी त्याची इत्थंभूत माहिती मिळवावी. माहितगार व्यक्ती, संस्था, ग्रुप, गाइड किंवा नियमित ट्रेकर्ससोबत जावं. 
मुक्कामाचं साहित्य, प्रथमोपचार पेटी किंवा औषधं सोबत घेणं आवश्यक. 
कोरडा खाऊ तसंच तिथं शिजविण्यासाठी पुरेसा शिधा, सामुग्री घ्यावी. 
अनेकदा वाटेत घनदाट जंगल तसंच निर्मनुष्य परिसर लागू शकतात. त्यामुळे आपला ग्रुप खूप छोटा नसावा. किमान १५ व्यक्ती सोबत असाव्यात. 
आणि हो, एवढी पायपीट करून गवसणारं अद्‍भुत निसर्गसौंदर्य कैद करण्यासाठी कॅमेरा सोबत न्यावा. 

(संकलनः श्रद्धा सिदीड)

from - http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/recharge/-/articleshow/24297985.cms